मुंबई : कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. मुंबईतील घाटकोपर, शिवाजी नगर भागातील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले की, “आजपर्यंत आपण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्यातील फुटून गेलेल्या गद्दारांशी लढलो. इतकंच नाही तर रक्ताचे नाते असलेल्या नातेवाईकांशी ही लढलो. मात्र या निवडणुकीत आपल्याला वेळप्रसंगी कपटी आणि चाणाक्ष मित्रांसोबत लढावं लागू शकतं, त्यामुळे अशांपासून सावध रहा.”
‘मातोश्री’वर सुरु असलेल्या उमेदवार पडताळणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आज घाटकोपर आणि शिवाजीनगर मधल्या उपशाखाप्रमुख, उपविभागप्रमुखांशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
युतीची चर्चा सुरु होण्याआधीच पारदर्शकतेच्या मुद्यावरून भाजपकडून वक्तव्य होत आहेत. त्यात आज किरीट सोमय्या यांनी सेनेला सद्यपरिस्थितीचं ज्ञान आणि भान असावं असं वक्तव्य करून पुन्हा डिवचलं आहे. त्यामुळे युतीची चर्चा सुरु होण्याआधीच दोन्ही पक्षात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.