नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचा पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज हेन्रिच क्लासेनचा राजस्थान रॉयल्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाच्या बंदीची कारवाई केली. त्यामुळे बीसीसीआयने त्याला आगामी आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई केली आहे. त्याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सने उपलब्ध खेळाडूंमधून हेन्रिच क्लासेनची आपल्या संघात निवड केली.

राजस्थान रॉयल्सने केवळ 50 लाख रुपये मोजून त्याची खरेदी केली. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात क्लासेनने पदार्पणात मॅचविनिंग खेळी उभारली होती. त्याला या सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचाही मान देण्यात आला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू दोषी आढळून आले होते. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांचा यामध्ये समावेश आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकी बारा महिन्यांची तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंद घालण्यात आली आहे.

डेव्हिड वॉर्नरलाही आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने त्याच्या जागी इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला करारबद्ध केलं आहे. आयपीएच्या लिलावात अॅलेक्स अनसोल्ड राहिला होता.