Legendary Zimbabwe Cricketer Heath Streak Death: झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीकचं निधन झालं आहे. आता ही अफवा नाही, हीथच्या निधनाच्या वृत्ताला कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. जगभरातील खेळाडूंनी हीथ स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली होती. पण काही वेळातच त्याचा सहकारी आणि जिम्बाब्वेचा खेळाडू हेन्री ओलांगा यांनी हीथ स्ट्रीकच्या निधनाचं वृत्त फेटाळलं होतं. तसेच, स्ट्रीकसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉर्टही शेअर केला होता. पण आता मात्र खरंच अष्टपैलू हीथ स्ट्रीक या जगातून निघून गेला असून त्यानं आपल्या सर्वांचा कायमचा निरोप घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणाऱ्या हीथ स्ट्रीकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 216 विकेट्स आहेत. यादरम्यान त्यानं 16 वेळा एका डावात 4 विकेट्स आणि 7 वेळा एका डावांत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्येही हीथ स्ट्रीकची गोलंदाज म्हणून धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.
हीथ स्ट्रीकनं 50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये 29.82 च्या सरासरीनं 239 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत एका डावांत 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. हीथ स्ट्रीकच्या फलंदाजीची तर बातच न्यारी. हा अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरला की, जणू वादळंच यायचं. आपल्या कारकीर्दीत स्ट्रिकनं कसोटी क्रिकेटमध्ये 1990 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 2943 धावा रचल्या आहेत. स्ट्रीकनं कसोटी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशकतं झळकावली आहेत. यासोबतच त्याच्याकडे वनडेमध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतरची कामगिरी
2000 मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं हीथ स्ट्रीकची कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. स्ट्रीकच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेनं 21 पैकी 4 कसोटी सामने जिंकले तर 11 सामन्यात पराभव झाला, तर 6 सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये, स्ट्रीकनं 68 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आणि त्यापैकी 47 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. तर संघानं 18 सामने जिंकले आहेत. स्ट्रीकच्या मृत्यूनंतर, अनेक आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अनेकांनी ट्वीट करत त्याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननंही ट्वीट कर स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली आहे.