मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यापासून हार्दिक पंड्याने स्वत:ला घरात बंद करुन घेतलंय. त्याचे वडिल हिमांशू पंड्या यांनी ही माहिती दिली. एका शो दरम्यान महिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीचा फलंदाज के.एल राहुलला चौकशी होईपर्यंत निलंबित केलं आहे. हार्दिक खूप निराश झाला असून कोणाचाही फोन उचलत नाही, असंही ते म्हणाले.

करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या टीव्ही शो मध्ये हार्दिक पंड्या आणि के.एल राहुल यांनी महिलांविरोधात आक्षेपार्ह मते व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर टिकेची झोड उडाली होती. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. तसंच बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याहून वापस बोलावलं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं.

हार्दिक जेव्हापासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतला आहे. तेव्हापासून तो शांत-शांत आहे. तो कोणालाही बोलत नाही. त्याने स्वत:ला घरात बंद करुन घेतलंय. दौऱ्याहून परतल्यानंतर त्याने घरातून बाहेर पाऊल ठेवलं नाही. अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

एवढंच नाही तर हर्दिकला मकर संक्रांतीला पतंग उडवायला खूप आवडतं. यावर्षी मात्र त्याने पतंगोत्सवातही भाग घेतला नाही.  संक्रातीच्या सणा दिवशीसुद्धा तो त्याच्या खोलीमध्येच होता, असं हार्दिकचे वडील म्हणाले.

त्याने केलेल्या वक्तव्याचा त्याला पश्चाताप आहे. त्याने स्वत:शी निश्चय केला आहे की तो अशी चूक भविष्यात कधी करणार नाही, असही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं होतं.





आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.

यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली होती.


संबंधित बातम्या