पुणे : पुण्यात अघोषित पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन दोन पंप बंद केले आणि पुण्याच्या दररोजच्या पाण्यात अडीचशे एमएलडी इतकी कपात केली. त्यामुळे आज पुणे शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला आहे.


सिंहगड भागात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं. सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे नवशा मारुती आणि चुनाभट्टीजवळ रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. आठ ते दहा घरांमध्येही पाणी शिरलं.

पुणे महापालिकेकडून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहिल्याचं सांगण्यात आलं आहे. खडकवासला धरण समुहातील धरणांमधे कमी पाणी शिल्लक असल्याने हे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेती आणि पिण्यासाठी पुरवून वापरायचे असेल तर पुण्यात पाणीकपात करणं आवश्यक आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्याबाबत वेगवेगळ्या स्तरांवर अनेक बैठका झाल्या. मात्र पाणीकपातीचा निर्णय घेतला गेला नाही. हा निर्णय घेण्यास प्रशासन किंवा नेते धजावत नव्हते. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच पंप बंद केले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याची कल्पना देण्यात आली नव्हती. जलसंपदा विभागाचे अधिकारी आता महापालिकेत जाऊन महापौरांची याबाबत भेट घेणार आहेत.