ओव्हल: भारताचं यंग रनमशिन म्हणून नावारुपास आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉला अजूनही कसोटी पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याला संधी मिळालीच नाही. त्याच्याऐवजी हैदराबादच्या हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण होत आहे. हनुमा विहारी हा भारताकडून कसोटीत प्रतिनिधीत्व करणारा 292 वा कसोटीपटू ठरला आहे.

पाचव्या कसोटीत पृथ्वी शॉला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पृथ्वीला अजून वाट पाहावी लागणार आहे. या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पंड्या आणि आर अश्विनला वगळून, हनुमा विहारी आणि रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे.


कोण आहे हनुमा विहारी?

हैदराबादच्या 24 वर्षीय हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली आहे, ज्याच्या बळावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

पृथ्वी शॉ

विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. रणजी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावावर आतापर्यंत सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत.

पाचवी कसोटी

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर हा सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडनं पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 अशी खिशात घातली आहे. त्यामुळे अखेरची कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. ओव्हल कसोटीत भारतीय संघात मोठे बदल होण्याची अपेक्षा आहेत.

संबंधित बातम्या

ओव्हल कसोटीसाठी कोहलीचा भरवशाचा फलंदाज कोण?

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल स्थानी कायम  

अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा