मुंबई : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. "राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.
"राम कदम यांची पार्श्वभूमी पहिली तर महिलांना मदत करणारी आहे. हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? आणि जरी चुकीचा अर्थ निघत असेल, तरी त्यांनी आता जाहीर माफी मागितल्यावर विषय संपवायला हवा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
"लोकप्रतिनिधींनी बोलतांना काळजी घेतली पाहिजे. तसेच एखाद्या वाक्याचा अर्थ काय होतो हे दाखवतांना माध्यमांनीही विचार केला पाहिजे. माध्यमांनीही त्यांना जे म्हणायचं होतं, तसा अर्थ जाईल हे बघितलं पाहिजे", असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणाचं खापर माध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
मात्र राम कदमांवर कारवाई होणार का? त्यांचं प्रवक्ते पद जाणार का? यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "कदमांवरील कारवाईबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील."
राष्ट्रवादीचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र
चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. "हा विषय भाजपसाठी संपला असेल मात्र आमच्यासाठी हा विषय संपलेला नाही. आम्ही याविषयी जाब विचारणारचं. भाजपने लोकप्रतिनिधींनी कसं वागायल हवं हे शिकवावं. भाजपने राम कदमांवर अजूनही कारवाई का केली नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चंद्रकांत पाटलांनी प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचाही समाचारही चित्रा वाघ यांनी घेतला. 'प्रसारमाध्यमांनी कसं वागावं हे चंद्रकांत पाटलांनी त्यांना शिकवू नये", असं चित्रा वाघ म्हणाल्या.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते. घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार राम कदम यांनी महिलांविषयक बेताल वक्तव्य केलं होतं.
व्हिडीओ- नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
संबंधित बातम्या