मुंबई: टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण इतका मोठा निर्णय घेण्याआधीही धोनी प्रचंड शांत होता.
क्रिकइंफो वेबसाइटच्या वृत्तानुसार, कर्णधारपद सोडण्याच्या इतक्या मोठ्या निर्णयाआधी धोनी नागपूरमध्ये झारखंडच्या रणजी संघासोबत तो आपल्या प्ले स्टेशनवर फीफा फुटबॉल गेम खेळत बसला होता. तो हे सारं काही इतक्या शांतपणे करत होता की, त्याच्या मनात असं काही सुरु असेल याची कुणी कल्पनाही केलं नसेल. बुधवारी गुजरातसोबत रणजी उपांत्य सामना हरल्यानंतर धोनीने आपल्या रुममध्ये गेट टूगेदर पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये त्याने झारखंड संघाच्या आपल्या खेळाडू्ंसाठी लंचही ठेवला होता.
काही बातम्यांनुसार, त्याने संघातील खेळाडूंसोबत सेल्फीही घेतले तसंच कर्णधारपदाशी निगडीत काही प्रश्नांची उत्तरंही त्यानं दिली.
धोनी भारताचा एकमेव असा कर्णधार आहे की, ज्यानं आयसीसीच्या आयोजित सर्व स्पर्धंमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 साली टी-20 विश्वचषक आणि 2011 साली वनडे विश्वचषक तसेच 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा इतिहास रचला आहे.
199 वनडे सामन्यात धोनीनं टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 110 सामन्यात त्यानं विजय मिळवून दिला आहे. तर 74 सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला. तर चार सामने अनिर्णित राहिले. 11 सामन्याचा काहीही निकाल लागला नाही. कर्णधार असतानाही धोनीनं फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने वनडे सामन्यात 54च्या सरासरीनं 6683 धावा केल्या आहेत.