नवी दिल्ली: उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी तेथील राजकीय उलथापालथी अजूनही थांबलेल्या नाहीत. आता मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये यूपी निवडणुकांसाठी युती होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर याबाबतची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
या युतीनंतर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला तब्बल 100 जागा मिळू शकतात. दरम्यान, अखिलेश यादव यांनी याआधीच 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. इतर जागांबाबत युतीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.
अखिलेश यादव यांनी ज्या 235 जागांची घोषणा केली होती त्यातील फक्त २ दोन जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला होता. पण आता ते दोन्ही आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेला समाजवादी पक्षातला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या या नव्या चालीनं उत्तरप्रदेशमधील राजकारण आता नेमकं कोणत्या दिशेनं जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
नेमका वाद काय?
निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता.
त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे.
त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते.