मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली.

https://twitter.com/PMOIndia/status/817221430974652416

जबरदस्त संवादफेक, भारदस्त आवाज आणि अभिनयातील अलौकिक लकब यामुळे ओम पुरी यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

ओम पुरी यांचा 'आक्रोश' हा सिनेमा अतिशय गाजला होता. आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या जबरदस्त सिनेमांना, ओम पुरींच्या अभिनयाचा परिसस्पर्श लाभला.

भूमिका मग ती विलनची असो वा हिरोची, कॉमेडी असो वा संवेदनशील राखट चेहऱ्याच्या ओम पुरींनी सर्व भूमिका सहज साकारल्या.

'घाशीराम कोतवाल'मधून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

चायना गेटमधील रिटायर्ड फौजी, घायलमधील एसीपी डिसुझा, हेराफेरीमधला खडकसिंग, चुपचुपकेमधील प्रभातसिंह चौहान या सर्व भूमिका ओम पुरींनी गाजवल्या. इतकंच नाही तर जाने भी दो यारो या सिनेमातील बिल्डर अहुजा आणि 'आस्था'मधील प्रोफेसर अमरला कोणीही विसरु शकणार नाही.

ओम पुरी यांची कारकीर्द

ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 मध्ये हरियाणामध्ये झाला होता. आपलं प्राथमिक शिक्षण त्यांनी ननिहाल पंजाबच्या पटियालामधून पूर्ण केलं होतं.

1976 साली पुण्यातील एफटीआयमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वत:चा थिएटर ग्रुप 'मजमा'ची स्थापना केली होती.

ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकीर्दीची सुरुवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा 'घाशीराम कोतवाल'पासून सुरुवात केली होती.

1980 साली आलेल्या 'आक्रोश' सिनेमानं त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली. आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका फारच गाजली होती.

‘अर्धसत्य’, ‘जाने भी दो यारों’, ‘नसूर’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘देहली 6’, ‘मालामाल वीकली’, ‘डॉन’, ‘रंग दे बसंती’, ‘दीवाने हुए पागल’, ‘क्यूँ ! हो गया ना’, ‘काश आप हमारे होते’ आणि ‘प्यार दीवाना होता है’ यासारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये त्यांनी खास भूमिका साकारल्या आहेत.

आतापर्यंत त्यांनी तब्बल 124 सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

1993 साली ओम पुरी यांचं नंदिता पुरी यांच्याशी लग्न झालं होतं. पण 2013 साली ते विभक्त झाले होते. ओम पुरी यांचा एक मुलगा असून त्याचं नाव इशान आहे.