रिओ दी जनेरोः रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठल्यानंतर भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दीपाचा आज 23 वाढदिवस आहे. मात्र तिला प्रशिक्षकाने नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे कोणीही दीपाला शुभेच्छा देऊ शकणार नाही.
दीपा 14 ऑगस्टला व्हॉल्टमध्ये अंतिम फेरीत खेळणार आहे. त्यापूर्वी तिला कोणीही भेटी नये यासाठी प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी तिला नजरकैदेत ठेवलं आहे. दीपाला केवळ तिचे आईवडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.
सेलिब्रिशन थांबवू शकतो, पण संधी नाही- नंदी
दीपाच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढण्यात आलं आहे. तिला भेटण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली आहे. दीपाचे आई-वडील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील. दीपाचं सर्व लक्ष सध्या खेळावर केंद्रीत केलं आहे, असं नंदी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
वाढदिवस साजरा करणं आपण टाळू शकतो, पण संधी आपल्यासाठी कधी थांबत नाही. त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. दीपाचा मित्र परिवार तसाही अत्यंत कमी आहे. त्यामुळे तिचाही या निर्णयाला विरोध नाही, असं नंदी यांनी सांगितलं.
संबंधित बातमीः रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक