रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. साखळी फेरीत ब गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटनकडून 3-0 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं.


या सामन्यात जिसेल अॅन्सलीनं 25व्या मिनिटाला गोल करुन ग्रेट ब्रिटनचं खातं उघडलं. मग निकोला व्हाईटनं 27व्य़ा मिनिटाला गोल डागून ग्रेट ब्रिटनची आघाडी 2-0 अशी वाढवली.

अॅलेक्झांड्रा डॅन्सननं 33व्या मिनिटाला गोल झळकावून ग्रेट ब्रिटनचा 3-0 असा विजय निश्चित केला. भारतीय महिलांसमोर आता आपल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला हा सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल.