ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात रॉबिन उथप्पाच्या 72 आणि सुनील नारायणच्या 42 धावांच्या खेळींच्या जोरावर कोलकात्यानं 20 षटकांत पाच बाद 187 धावांची मजल मारली होती. मग विजयासाठी 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या मॅक्युलमनं अरॉन फिन्चच्या साथीनं सलामी ला 42 धावांची झटपट भागीदारी रचली.
पावसानं व्यत्यय आणल्यामुळं या सामन्यात पाऊण तासाचा वेळ वाया गेला. त्यात मॅक्युलम 17 चेंडूंत 33 धावांवर माघारी परतल्यानं गुजरातची टीम संकटात सापडली होती. पण रैनानं एका बाजूनं धावांचा ओघ सुरू ठेवला आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रैनानं 46 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांसह 84 धावांची खेळी केली.