नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये काश्मिरी नागरिकांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यात आला होता. तर राजस्थानमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाणी झाल्याची घटना घडली होती. या घटनांवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेऊन, गृहमंत्र्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात वसलेल्या काश्मिरी नागरिकांची सुरक्षा निश्चित करावी, अशा सूचना दिल्या आहेत.


गृहमंत्री म्हणाले की, ''काही ठिकाणी काश्मिरी नागरिकांशी गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील काश्मिरी नागरिकांची सुरक्षा निश्चित करावी. तसेच सर्व देशवासियांनीही काश्मिरी तरुणांना आपल्या कुटुंबातला घटक समजूनच, त्याच्यांशी योग्य वर्तन करावे.''

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही बॅनर लागले होते. या बॅनरमधून काश्मिरी नागरिकांवर बहिष्कार टाकण्याचे, तसेच काश्मीरी नागरिकांनीही आपल्या राज्यात परत जावं असं सांगण्यात येत होतं. यानंतर मेरठ पोलिसांनी तत्काळ हे बॅनर काढून टाकले होते. तसेच याप्रकरणी हिंदू संघटना नवनिर्माण सेनेचे नेते अमीर जानी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, यानंतर जानी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगत, काश्मिरी तरुणांनी आपल्या राज्यात परत जाण्याचा सांगितले आहे. अन्यथा 30 एप्रिलपासून त्यांच्याविरोधात हल्लाबोल मोहीम राबवली जाईल, अशी धमकी दिला आहे.