मुंबई: भविष्यात तुम्हाला बर्गर, पिझ्झाप्रमाणे पेट्रोल किंवा डिझेलही घरपोच मिळू शकतं. किमान तसे संकेत पेट्रोलियम मंत्रालयानं दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं ट्विट पेट्रोलियम मंत्रालयानं केलं आहे.

दरम्यान, ही सुविधा कोणत्या ठिकाणी देणं शक्य आहे यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाचा अभ्यास सुरू आहे. पेट्रोल पंपावरच्या मोठ्या रांगांपासून ग्राहकांची सुटका करण्यासाठी ही सुविधा सुरु करण्याचा सरकारचा मानस असल्याचं समजतं आहे.


पेट्रोल आणि डिझेल घरपोच मिळणार असलं तरीही त्यासाठी तुम्हाला प्री-बुकींग करावी लागणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात 59 हजार 595 पेट्रोलपंप असून, दररोज साडे चार कोटी ग्राहक पेट्रोल-डिझेलची खरेदी करतात. दररोज 1800 कोटी रुपये किंमतीच्या पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाते.

पेट्रोलियम उत्पादनांपैकी गॅस सिलेंडर घरपोच मिळतो. त्याच धर्तीवर पेट्रोल आणि डिझेलही घरपोच मिळू शकणार आहे.