गांधीनगर: पार्थिव पटेलच्या गुजरात संघाने रणजी चषकात इतिहास रचला आहे. गुजरातने कारकिर्दीत पहिल्यांदाच रणजी चषकावर नाव कोरलं. महत्त्वाचं म्हणजे गुजरातने रणजी चषक तब्बल 45 वेळा नावावर करणाऱ्या मुंबईला 5 विकेट्सनी धूळ चारली.


संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करुन, गुजरातला एकहाती फायनलपर्यंत पोहोचवणारा कर्णधार पार्थिव पटेलच या सामन्याचा हिरो ठरला. पटेलने तब्बल 143 धावा करुन, गुजरातला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गुजरातनं मुंबईचा पाच विकेट्सनी पराभव केला.  पार्थिव पटेलनं कर्णधारास साजेशी खेळी उभारून, गुजरातला निर्णायक विजय मिळवून दिला. त्यानं 196 चेंडूंमधली 143 धावांची खेळी 24 चौकारांनी सजवली.

पार्थिवनं मनप्रीत जुनेजाच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 116 धावांची आणि रुजुल भटच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचून गुजरातला विजयपथावर नेलं.

मनप्रीत जुनेजानं 54 धावांची, तर रुजुल भटनं नाबाद 27 धावांची खेळी करून गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मुंबई पहिला डाव -

  • सर्वबाद - 228 (पृथ्वी शॉ 71, सूर्यकांत यादव 57)


गुजरात पहिला डाव

  • सर्वबाद - 328 (पार्थिव पटेल 90, मनप्रीत जुनेजा 77)


मुंबई दुसरा डाव

  • सर्वबाद 411 (अभिषेक नायर 91, श्रेयस अय्यर 82, आदित्य तरे 71, सूर्यकांत यादव 49)


गुजरात दुसरा डाव

  •  पार्थिव पटेल 143, मनप्रीत जुनेजा 54)