मुंबई: भाईंदर इथं एका विद्यार्थिनीने प्राचार्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्राचार्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.
भाईंदर पूर्वेकडील शंकर नारायण महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका मुलीच्या तक्रारीनंतर प्राचार्यांना अटक झाली. तक्रारदार मुलगी महाविद्यालयात होणाऱ्या अनेक उपक्रमांत सक्रिय होती.
महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव सुरु असल्याने ती त्यात सहभागी झाली होती. काही कामानिमित्त प्राचार्याची तिला भेट घ्यायची असल्याने, ती त्यांना भेटण्यासाठी लिफ्टने निघाली होती. मात्र प्राचार्य तिला लिफ्टमध्येच भेटले.
यावेळी लिफ्टमध्ये दोघेच असल्याने त्याचा फायदा घेत प्राचार्य यादव यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
ही बाब विद्यार्थिनीने पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातेवाईकांनी महाविद्यालयात जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
परंतु पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून प्राचार्य यादव यांना शुक्रवारी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दरम्यान कॉलेजकडून याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आली नाही.