Google Doodle: गुगल आपल्या डूडलच्या माध्यमातून नेहमी महान व्यक्तींचे स्मरण करत असतं. आज याच गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून बास्केटबॉलची सुरुवात करणाऱ्या जेम्स नायस्मिथ यांच्या कार्याची आठवण ठेवली आहे.


सुमारे 130 वर्षापूर्वा कॅनडीयन-अमेरिकन नागरिक असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉलची सुरुवात केली. पेशाने शिक्षक, डॉक्टर, आणि कोच असलेल्या जेम्स नायस्मिथ यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित रहावं यासाठी 1891 साली बास्केटबॉलच्या खेळाची ओळख करुन दिली आणि तिथूनच बास्केटबॉलची सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय.


जेम्स नायस्मिथ यांनी कॅनडाच्या ओंटारियो या शहरातील मॅकगिल विद्यापीठातून शारीरिक शिक्षणाची पदवी घेतली. 1890 साली त्यांनी मेसाच्युसेट्सच्या स्प्रिंगफील्ड मधील YMCA इंटरनॅशनल ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरीला सुरुवात केली. या ठिकाणी इनडोअर गेम विकसित करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.


पुलंना गुगलची मानवंदना, जयंतीनिमित्त बनवलं खास डूडल


नवा इनडोअर गेम विकसित करताना विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक स्थितीही उत्तम राहिली पाहिजे असा विचार करुन जेम्स नायस्मिथ यांनी बास्केटबॉलची सुरुवात केली. या माध्यमातून ते विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करुन घ्यायचे. त्यामुळे हळू-हळू बास्केटबॉलच्या पायाभूत नियमांचाही त्यांनी विकास केला.


ऑलंपिकमध्ये समावेश
जेम्स नायस्मिथ यांनी 21 डिसेंबर 1891 साली पहिल्यांदा खेळाडूंच्या मदतीने या खेळाची सुरुवात केली. या खेळाचे अनेक नियम हे फुटबॉल आणि फील्ड हॉकीमधून घेण्यात आले. त्यानंतर हा खेळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगभरात प्रसिध्द झाला. 1936 सालच्या बर्लिन ऑलंपिकमध्ये पहिल्यांदा बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला.


प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर जोहरा सहगल यांना गूगल डूडलद्वारे आदरांजली


विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुलित रहावे यासाठी सुरु करण्यात आलेला बास्केटबॉल हा खेळ जगभर प्रसिध्दीस पावला. बास्केटबॉल जास्तीत-जास्त युवकांपर्यंत पोहचवण्यासाठी जेम्स नायस्मिथ यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांचा या कार्याचं गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून स्मरण केलं आहे.


Google चा आज 22 वा वाढदिवस; बनवलं खास डूडल!