मुंबई : सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर एका चुटकीवर देणाऱ्या आणि आपल्या आयुष्याचा एकप्रकारे अविभाज्य भाग बनलेल्या सर्च इंजिन गूगलचा आज 22 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी गुगलने आपल्या खास स्टाईलमध्ये डूडल बनवलं आहे. डूडल 90 च्या दशकातील एखादा वाढदिवस साजरा करण्यासाठी बनवलं आहे, असं डिझाइन करण्यात आलं आहे. डूडलमध्ये गूगलची सर्व अक्षरे आहेत. ज्यामध्ये 'G' हे पहिलं अक्षर लॅपटॉप स्क्रीनसमोर दाखवण्यात आले आहे, तर उर्वरित पाच अक्षरे एका फ्रेममध्ये दाखवली आहेत.


सर्च इंजिन गूगलची 1998 मध्ये स्थापना झाली. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन या दोन पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी याची स्थापना केली. लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या अधिकृत लाँचिंगपूर्वी त्याला 'Backrub' असे नाव दिलं होतं. काही वर्षांनी त्याचं नाव Google ठेवण्यात आले. याच नावाने ते आता संपूर्ण जगात ओळखले जाते. हे जगभरातील सर्व प्रकारची माहिती सामायिक करण्यासाठी डिझाइन केले आहे.



सुरुवातीच्या काळात गूगलचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्यात आला. गूगल आपला वाढदिवस 2005 पर्यंत 7 सप्टेंबर रोजी साजरा करत होता. त्यानंतर 8 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी गुगलचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. अलीकडेच गुगलने 27 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.


गूगल सध्या गूगल डूडलच्या माध्यमातून जगभरातील खास प्रसंग साजरे करत आहे. सन 1998 सालापासून गूगलने स्वतःची डूडल्स बनवण्यास सुरुवात केली. बर्निंग मॅन फेस्टिव्हलच्या सन्मानार्थ गुगलने प्रथम डूडल तयार केलं होतं. गूगल जगभरात 100 हून अधिक भाषांमध्ये काम करत आहे. Alphabet Inc ही गुगलची मूळ कंपनी आहे.