मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज ईडी समोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी ईडीनं याआधी 30 डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. पण कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकनाथ खडसे त्यावेळी चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.


एकनाथ खडसे यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्याने आज एकनाथ खडसे ईडी चौकशी करता हजर राहणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. खडसे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. एकनाथ खडसे मुंबईत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.


काय आहे प्रकरण?


पुण्यात भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने क्वॉरंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वॉरंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार (Bhosari MIDC land purchase) या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


पाहा व्हिडीओ : एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार



ईडी लावली तर मी सीडी लावेन : एकनाथ खडसे


भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी केले आहेत. आता देखील सहकार्य करेन. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही, असं एकनाथ खडसे ईडीच्या नोटीसबाबत म्हणाले होते. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.