सिडनी: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने मलेशियाचा 2-1 ने पराभव करत, उपांत्यफेरीत धडक मारली. या विजयामुळे भारत सात गुणांसह ब गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारताने यापूर्वी वेल्सचा पराभव केला होता, तर पाकिस्तासोबतचा सामना अनिर्णित राहिला होता.

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या हरमनप्रीतने तिसऱ्याच मिनिटाला गोल करत, भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

भारताची ही आघाडी 13 मिनिटंच राहिली. कारण सामन्याच्या 16 व्या मिनिटाला मलेशियाच्या फैजल सारीने गोल करत, बरोबरी केली.

हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र त्यानंतर 44 व्या मिनिटाला पुन्हा हरमनप्रीतने आणखी एक गोल करत, भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर भारताने टिच्चून खेळी करत, ही आघाडी कायम राखली आणि मलेशियावर 2-1 अशी मात केली.