पंजाबकडून गुजरात लायन्सचा धुव्वा, 26 धावांनी विजय
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 08:26 PM (IST)
राजकोट : किंग्ज इलेव्हन पंजाबनं राजकोटमधील आयपीएल सामन्यात गुजरात लायन्सचा 26 धावांनी पराभव करुन, प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं. या सामन्यात पंजाबनं गुजरातला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करण्याचं आव्हान गुजरातला पेलवलंच नाही. पंजाबच्या संदीप शर्मा, केसी करिअप्पा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून गुजरातला 20 षटकांत सात बाद 162 असं रोखलं. गुजरातकडून सुरेश रैना 32 आणि दिनेश कार्तिकनं नाबाद 58 धावांची खेळी केली. त्याआधी पंजाबच्या हाशिम अमलाच्या फॉर्मचा दणका गुजरातला बसला. अमलानं 40 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. त्यामुळेच पंजाबला 20 षटकांत सात बाद 188 धावांची मजल मारता आली. शॉन मार्शनं 30, ग्लेन मॅक्सवेलनं 31 आणि अक्षर पटेलनं 34 धावांची खेळी करून पंजाबच्या डावात मोलाचा वाटा उचलला.