पॅरिस : वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीनं इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 असा सनसनाटी विजय मिळवून युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.


 
बोर्डोमध्ये झालेल्या या सामन्यात मेसूत ओझिलनं 65व्या मिनिटाला गोल करुन जर्मनीचं खातं उघडलं. पण लिओनार्डो बोनूचीनं 78व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल डागून इटलीला बरोबरी साधून दिली.  आधी निर्धारित वेळत आणि मग अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटनं सामन्याचा निर्णय घेण्यात आला.

 
पेनल्टी शूटआऊटच्या पहिल्या पाच प्रयत्नात दोन्ही संघांना केवळ दोनच गोल करता आले. मग पुढच्या तीन प्रयत्नात इटलीसाठी गियाचेरीनी, पारोलो आणि डी सिग्लियोनं गोल केले. तर जर्मनीसाठी मॅट हमेल्स, किमिक आणि बोएटेंगनं गोल डागले.

 
नवव्या प्रयत्नात इटलीच्या मॅटियो डार्मायनची पेनल्टी किकी जर्मनीचा गोलकीपर मॅन्युअल नोयानं थोपवून धरली. आणि जर्मनीला विजयाची संधी उपबल्ध करुन दिली. त्यानंतर जोनास हेक्टरनं गोल झळकावून जर्मनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.