नवी दिल्ली : ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी आणि आंद्रे रसेल या वेस्ट इंडीजच्या स्टार क्रिकेटर्सनी विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीवर टीका केली आहे. सॅमीनं पोलार्डचं अभिनंदन करतानाच तुला संघात स्थान कसं मिळालं असा खोचक प्रश्न विचारला आहे.

 
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी तिरंगी मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ गुरुवारी जाहीर झाला. विंडीजच्या संघात गेल, ब्राव्हो आणि सॅमीचा समावेश नाही, पण कायरन पोलार्ड आणि सुनील नारायणला मात्र स्थान मिळालं आहे.

 
वेस्ट इंडीजच्या संघात स्थान मिळवायचं, तर जानेवारीत झालेल्या सुपर फिफ्टी या वेस्ट इंडीजच्या वन डे स्पर्धेत सहभागी होणं गरजेचं होतं. पण गेल, ब्राव्हो आणि सॅमी त्यादरम्यान ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये खेळत होते. दुसरीकडे पोलार्ड दुखापतीमुळे सुपर फिफ्टीमध्ये खेळू शकला नाही तर सुनील नारायण अवैध गोलंदाजी शैलीमुळे एप्रिलपर्यंत निलंबित होता.

 
पोलार्ड फिट असता तर आमच्याप्रमाणेच तोही बिगबॅश लीगमध्ये खेळला असता, असं गेलनं नमूद केलं आहे. ब्राव्होनं तर निवड समितीचा करभार म्हणजे एक जोकच असल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.