मुंबई : भावनांचा उद्रेक झाल्याबद्दल गंभीरने दिलगिरी व्यक्त केली आहे. हो माझी चूक झाली. रागाच्या भरात मी खुर्चीला लाथ मारली. मात्र त्याच वेळी रोल मॉडेल्सना भावना नसतात का, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. माझ्या एका कृत्यामळे युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांच्या चमकदार कामगिरीकडे दुर्लक्ष झाल्याची खंतही गंभीरने व्यक्त केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला अशोभनीय वर्तनासाठी त्याच्या मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात कोलकात्याच्या सूर्यकुमार यादवनं एक चौकार ठोकला, त्या वेळी डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीरनं खुर्चीला लाथ मारली होती.
कोलकाता विजयाच्या दिशेने कूच करत असतानाही गंभीरनं असं वर्तन का करावं, हा प्रश्न समालोचकांनाही पडला होता. पण गंभीरची ती कृती लेव्हल वनचा शिस्तभंग असल्यानं सामनाधिकाऱ्यांनी त्याला मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे.
त्याच सामन्यात षटकांची गती संथ राखल्याप्रकरणी बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात षटकांची गती संथ राखण्याची ही चूक विराटकडून दुसऱ्यांदा घडली होती. त्यामुळे त्याच्याकडून यावेळी दुप्पट दंड वसूल
करण्यात आला.
पहिल्या चुकीसाठीचा 12 लाख रुपयांचा दंड जमेस धरून विराटकडून एकूण 36 लाख रुपये दंडापोटी जमा करण्यात आले आहेत.