व्याजमाफी नव्हे कर्जमाफी द्या, लातुरात उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 04 May 2016 12:56 PM (IST)
लातूर : शेतकऱ्यांना व्याजमाफीऐवजी कर्जमाफी द्या असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लातूर, उस्मानाबाद आणि बीडच्या एकदिवसीय दौऱ्यावर असताना लातूरमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. उन्हाळ्यानंतर पेरणीची कामं सुरु होतील. त्यामुळे दुष्काळातून शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असल्यास कर्जमाफी दिली जावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी इतर कामांचा आढावा घेतला आणि जलसंधारण कामांची पाहणी केली. दरम्यान पक्षाची जेवढी शक्ती आहे तेवढी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी खर्ची करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. हा दौरा सरकारची उणीदुणी काढण्यासाठी नसून मदत करण्यासाठी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी कामं केली नाहीत, त्यांनी टीका करु नये असं म्हणत मनसेवरही उद्धव यांनी अप्रत्यक्ष टीका केली.