नवी दिल्लीः न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड न झाल्यामुळे गौतम गंभीरने नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आपल्यावर दुर्लक्ष झालं आहे. मात्र न घाबरता पुन्हा पुनरागमन करीन, अशी आशा गंभीरने बोलून दाखवली आहे.


 

गंभीरने ट्विटरद्वारे आपली नाराजी बोलून दाखवली. गेली दोन वर्षे भारतीय संघातून बाहेर असलेला गंभीर यंदा दुलीप करंडक सामन्यांमध्ये दमदार फॉर्मात आहे. त्याने चार अर्धशतकं ठोकून भारताच्या कसोटी संघाचं दार ठोठावलं होतं.

https://twitter.com/GautamGambhir/status/775415157342208001

वेस्ट इंडिज दौऱ्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा अपयशी ठरल्यामुळे गंभीरच्या कसोटी पुनरागमनाविषयी अनेकांना आशा वाटत होती. पण कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीने धवन आणि रोहितवर पुन्हा विश्वास दाखवल्याने गंभीरची पुनरागमनाची संधी हुकली.

 

अनेक वर्षे वाट पाहून पुन्हा संधी हुकल्यामुळे गंभीरने जाहीरपणे नाराजी बालून दाखवली. मी नाराज झालो असलो तरी हार मानलेली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष झालंय, पण मी मैदानातून पळ काढणार नाही. माझी आणखी प्रतीक्षा करण्याची तयारी आहे. संघर्षापासून दूर हटणार नाही. मी लढणार. मला लढायचं आहे, अशा शब्दात गंभीरने नाराजी मांडली आहे.