मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजे देशातील युवा खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ मानलं जातं. पण अनेक गुणवान खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही मिळत नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या बाबतीत तेच घडलं आहे.

 
24 वर्षीय शार्दुलनं खरं तर गेल्या काही मोसमात मुंबईकडून विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. यंदाच्या मोसमात त्यानं अकरा रणजी सामन्यांमध्ये 41 विकेट्स काढल्या होत्या. तसंच रणजी फायनलमध्ये आठ विकेट्स काढून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांत इंग्लंडविरुद्ध 34 धावांत दोन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19 धावांत एक विकेट काढली होती.

 
त्याच्या मागोमाग आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळून टीम इंडियाचं दार ठोठावण्यासाठी शार्दुल उत्सुक होता. पण पंजाबनं शार्दुलला केवळ एकाच सामन्यात खेळवलं. आता तर शार्दुलला पंजाबनं सुटीच दिली आहे.

 
शार्दुलसह अरमान जाफर आणि प्रदीप साहूलाही पंजाबनं रिलीज केलं आहे. म्हणजेच हे तिघं उर्वरीत मोसमात एकही सामना खेळू शकणार नाहीत. शार्दूलची त्यामुळे निराशा झाली असली, तरी सरावाच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचं त्यानं सांगितलं. दरम्यान, मुंबईच्या अखिल हेरवाडकरलाही दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सुट्टी दिली आहे.