लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतच्या यष्टीरक्षणाने दिग्गजांना निराश केलं आहे. भारताच्या माजी यष्टीरक्षकांच्या मते, रिषभला आपल्या खेळात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेतील सहा डावांमध्ये 76 अतिरिक्त धावा दिल्या. दरम्यान, यातील 20-25 धावांमध्ये रिषभची चूक नव्हती.

भारताचे माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, किरण मोरे आणि दीप दासगुप्ता यांच्या मते, रिषभला सुधारणा करण्याची गरज आहे. याशिवाय निवडकर्त्यांचंही यष्टीरक्षकाबाबत स्पष्ट धोरण असावं. कारण, रिद्धीमान साहाचंही पुढील तीन ते चार महिने खेळणं शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

“तो (रिषभ) सध्या नवीन आहे. आयपीएलच्या आधारावर खेळाडूची निवड करणं चुकीचं धोरण आहे. यष्टीरक्षणात त्याच्या बेसिक गोष्टीच बरोबर नाहीत. माझी चिंता ही आहे, की तो इंग्लंडमध्ये फिरकीपटूंसमोर यष्टीरक्षण करु शकत नसेल, तर मायदेशात खेळताना त्याला चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मोठी अडचण येईल”, असं मोंगिया म्हणाले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून कुणाला संधी द्यावी, असाही प्रश्न मोंगिया यांनी विचारण्यात आला. त्यांनी पार्थिव पटेलचं नाव सुचवलं.

“पार्थिव दक्षिण आफ्रिकेत दुसरा यष्टीरक्षक होता. तो प्लॅनमधून कसा बाहेर झाला माहित नाही, पण त्याला संधी दिली पाहिजे आणि हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यष्टीरक्षकांसाठी विशेष शिबिरांचं आयोजन का केलं जात नाही तेच कळत नाही,” असंही ते म्हणाले.

निवडकर्ते आगामी मालिकेसाठी अनुभवाला प्राधान्य देतील, असं मत दासगुप्ता यांनी व्यक्त केलं. रिषभला सुधारणा करण्याची गरज आहे. पण एका मालिकेच्या आधारावर खेळाडूला संघातून बाहेर केलं जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांच्या मते, रिषभ पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी एक संधी दिली जावी. तो एक प्रतिभासंपन्न खेळाडू आहे. त्याने अतिरिक्त धावा दिल्या असल्या तरी झेल सोडलेला नाही. यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा किरण मोरे यांनी व्यक्त केली.