लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर अॅलिस्टर कूकने आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकून कारकिर्दीचा शेवट अविस्मरणीय बनवला. भारताविरुद्धच्या पाचव्या सामन्यात कूकने कसोटी कारकिर्दीतील 33 वं शतक करुन 147 धावांची खेळी रचली.

कूकने 161 कसोटी सामन्यात 12472 धावा करुन फलंदाज म्हणून आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला. महत्त्वाचं म्हणजे 2006 मध्ये नागपूरमध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या अॅलिस्टर कूकने निरोपही भारताविरुद्धच घेतला.

इंग्लिश मीडियाने अॅलिस्टर कूकला खास अंदाजात अलविदा केलं. इंग्लिश मीडियाने कूकला ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी 33 बिअरच्या बाटल्या भेट म्हणून दिल्या. कारण 33 वर्षीय कूकने आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात 33वं शतक ठोकलं. या मोठ्या विक्रमासाठी इंग्लिश मीडियाने कूकला 33 बिअरच्या बाटल्या भेट दिल्या. या गिफ्टसाठी कूकने सर्व पत्रकारांचे आभारही मानले.


या बिअरच्या बाटल्या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या आहेत आणि त्यांच्यावर विविध पत्रकांनी मेसेज लिहिले आहेत. यावेळी एका पत्रकाराने सांगितलं की, 'अनेक चढ-उतार आले आहेत, पण तुमच्या वर्तनात कायमच सौजन्य असायचं. आम्हाला केवळ तुमचं कौतुक करायचं आहे. मी दारु पिणार नाही, असं तुम्ही एकदा मला म्हणाला होता. पण तुम्ही एक बिअर मॅन आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला बिअरच्या 33 बाटल्या देत आहोत. प्रत्येक बिअरच्या बाटलीवर प्रत्येक सदस्याचा एक छोटा मेसेज आहे."