मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेलं मॅच फिक्सिंगचं भूत अजूनही खाली उतरलेलं दिसत नाही. मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिस याच्यासह श्रीलंकेच्या तिघा आणि पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचा अहवाल 'अल जझिरा' वृत्तवाहिनीने दिला आहे. मॉरिसने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.


कतारमधील 'अल जझिरा' चॅनेलच्या डेव्हिड हॅरिसन या रिपोर्टरने आपण ब्रिटिश उद्योगपती असल्याचं भासवून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विविध खेळाडू आणि ऑफिशियल्सशी संधान बांधलं होतं.

हॅरिसन यांनी केलेल्या 'क्रिकेट्स मॅच फिक्सर्स' या 54 मिनिटांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमध्ये तब्बल चार कसोटी सामने फिक्स झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा समावेश होता.

इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटी (16 ते 20 डिसेंबर 2016), ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटी (16 ते 20 मार्च 2017) आणि श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटी (26 ते 29 जुलै 2017) मध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप आहे.

डॉक्युमेंट्रीमध्ये कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूचा उल्लेख नसला, तरी स्टिंगमध्ये काही जणांचे फोटो दिसत आहेत. दाऊद गँगच्या अनिल मुनावरसह मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिस, पाकिस्तानचा हसन रझा, श्रीलंकेच्या दिलहारा लोकुहेट्टिगे, जीवन्था कुलतुंगा आणि थरिन्दू मेंडिसचा यांचा फिक्सिंगमध्ये हात असल्याचं अल जझिराच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.