जामनगर : आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी याचे GOAT टूर ऑफ इंडिया या अंतर्गत देशातील चार शहरांमध्ये म्हणजेच कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत कार्यक्रम झाले. यानंतर त्यानं गुजरातमधील जामनगर येथील वनताराला भेट दिली. या भेटीत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनकडून चालवल्या जाणाऱ्या वनतारा या वन्यजीव बचाव, देखभाल आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. या ठिकाणी मेस्सीनं हत्तीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद गेतला. मेस्सीनं सिंहांना जवळून पाहत आनंद घेतला. मेस्सीला वनतारा खूप आवडलं त्यानं या ठिकाणी पुन्हा एकदा येणार असल्याचं सांगितलं.
लिओनेल मेस्सी भारतात पहिल्यांदा कोलकाता येथे आला. तिथं त्याला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्यानंतर तो हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमांना हजर राहिला. या सर्व ठिकाणांवर मेस्सीला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणावर जमले होते. यानंतर मेस्सी वनतारा येथे पोहोचला. इथं लिओनेल मेस्सीनं भारतीय संस्कृतीचा जवळून अनुभव घेतला, ती समजून घेत आनंद घेतला.
मेस्सीला वनतारा आवडलं
लिओनेल मेस्सीला वनतारा येथे भारतीय अध्यात्मिक प्रथांची ओळख करुन देण्यात आली. तिथं मेस्सी मंदिरात पोहोचला, शिवलिंगावर दूधाचा अभिषेक केला. भारतीय परंपरांनुसार त्यानं पूजा केली. मेडिटेशन देखील त्यानं केलं, याचा मेस्सीवर प्रभाव दिसून आला.
मेस्सीनं वनतारामध्ये असलेल्या प्राण्यांसोबत खूप वेळ घालवला. वनतारा हे केंद्र संरक्षण, पुनर्वसन आणि देखभाल यावर चालतं. मेस्सीनं प्राण्यांच्या देखभालीच्या दिनचर्येची माहिती घेतली. प्राण्याची देखभाल करणाऱ्या पशु चिकित्सक कर्मचाऱ्यांसोबत मेस्सीनं संवाद साधला.
मेस्सीचं पुन्हा येण्याचा शब्द
मेस्सीनं म्हटलं की वनतारा जे करतं ते खरंच खूप सुंदर आहे, प्राण्यांसाठी केलं जाणारं काम, त्यांची केली जाणारी देखभाल, ज्या प्रकारे प्राण्यांना वाचवलं जाते आणि देखभाल केली जाते हे खरंच प्रभावी आहे, असं मेस्सी म्हणाला. मेस्सीनं चांगला वेळ घालवला. पूर्ण वेळ चांगलं वाटलं. हा एक अनुभव आहे जो तुमच्यासोबत राहतो, आम्ही निश्चितपणानं या कामाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी पुन्हा येऊ, असं मेस्सीनं म्हटलं.