FIFA WC 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक 2022 मधील गट फेरीचे सामने संपले असून राऊंड ऑफ 16 मध्ये दाखल झालेल्या अंतिम संघाची नाव निश्चित झाली आहेत. या 16 संघामध्ये आता नॉकआऊट सामने खेळले जातील. ज्यात विजयी संघाला पुढील फेरीत प्रवेश करता येईल. तर, पराभूत झालेल्या संघाला आपलं सामान गुंडळावं लागणार आहे. दरम्यान, राऊंड ऑफ 16 मध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार आहे? यावर एक नजर टाकुयात.


पहिला सामना (नेदरलँड्स विरुद्ध यूएसए)
नेदरलँड्स विरुद्ध यूएसए यांच्यात राऊंड ऑफ 16 चा पहिला सामना खेळला जाणार आहे. नेदरलँडचा संघ ग्रुप ए मध्ये अव्वल, तर यूएस संघानं ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान पटकावलं. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना 3 डिसेंबरला म्हणजेच आज रात्री 8.30 वाजता होणार आहे.


दुसरा सामना (अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
अर्जेंटिना ग्रुप सी मध्ये अव्वल ठरलं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानं ग्रुप डी मध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. अहमद बिन अली स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. हा सामना 4 डिसेंबरला मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल.


तिसरा सामना (फ्रान्स विरुद्ध पोलंड)
ग्रुप डी मध्ये अव्वल असलेल्या फ्रान्सचा सामना ग्रुप सी मध्ये दुसऱ्या स्थानावरील पोलंडशी होईल. हा सामना 4 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता खेळला जाणार आहे. दोहा येथील अल थुमामा स्टेडियमवर दोन्ही संघामधील थरार पाहायला मिळणार आहे.


चौथा सामना (इंग्लंड विरुद्ध सेनेगल)
ग्रुप बी मध्ये टॉपवर असलेल्या इंग्लंडचा सामना याच गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या सेनेगलशी होणार आहे.  हा सामना अल बेट स्टेडियमवर होणार आहे. इंग्लंड आणि सेनेगल यांच्यातील सामना 5 डिसेंबर मध्यरात्री 12.30 वाजता आमनेसामने असतील. 


पाचवा सामना (क्रोएशिया विरुद्ध जपान)
 गेल्या वर्षीचा उपविजेता क्रोएशियाचा सामना जपानशी होणार आहे. स्पेन आणि जर्मनीसारख्या संघांना हरवून जपाननं ग्रुप ई मध्ये अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडं क्रोएशियानं ग्रुप एफमध्ये दुसरं स्थान पटकावलं. 5 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता अल जनुब स्टेडियमवर दोन्ही संघ आमने- सामने असतील.


सहावा सामना (ब्राझील विरुद्ध कोरिया रिपब्लिक)
ग्रुप जी मधील टॉपर ब्राझीलला ग्रुप एच मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीम कोरिया रिपब्लिकचे आव्हान असेल. हा सामना 6 डिसेंबरला मध्यरात्री 12.30 वाजता होणार आहे. हा सामना स्टेडियम 974 येथे होणार आहे.


सातवा सामना (स्पेन विरुद्ध मोरोक्को)
स्पेन आणि मोरोक्को हे दोन्ही संघ एज्युकेशन सिटी स्टेडियमवर भिडतील. मोरोक्कन संघानं ग्रुप एफ मध्ये अव्वल स्थान पटकावलं. तर, स्पेन ग्रुप ई मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना 6 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता सुरू होईल.


आठवा सामना (पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड)
ग्रुप जी मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला स्वित्झर्लंड संघाचा सामना ग्रुप एच मधील टॉपर पोर्तुगालशी होणार आहे. हा सामना 7 डिसेंबरला मध्यरात्री 12.30 वाजता होणार आहे. हा सामना लुसेल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 


कधी, कुठं पाहायचे सामने?
फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धेतील सर्व सामने स्पोर्ट्स18 1 आणि स्पोर्ट्स18 1 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.


हे देखील वाचा-