FIFA WC 2026 Format: नॉर्थ अमेरिकेत होणाऱ्या FIFA वर्ल्ड कप 2026 (FIFA WC 2026) च्या आयोजनात मोठा बदल करण्यात आला आहे. FIFA च्या वतीने मंगळवारी (14 मार्च) एक निवेदन जारी करण्यात आलं. फिफाने या निवेदनात म्हटलं आहे की, "पुढच्या वर्डकपमध्ये 4-4 टीमचे 12 ग्रुप असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 ग्रुप तयार करण्याची योजना होती." FIFA ने निवेदनात म्हटलं आहे की, "नव्या फॉरमॅटनुसार प्रत्येक टीमला वर्ल्डकपमध्ये किमान तीन मॅच खेळण्याची संधी मिळेल आणि या मॅच पुरेशा विश्रांतीसह खेळवल्या जातील."
विशेष म्हणजे, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 टीम सहभागी होत होत्या, ज्यांची 8 ग्रुपमध्ये विभागणी केली जायची. तर त्या प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ होते आणि ग्रुपमधील 2 टीम टॉप-2 नॉक आऊट स्टेजमध्ये पोहोचायच्या. पण आता नव्या फॉरमॅटनुसार, पुढच्या फिफा स्पर्धेत एकूण 48 टीम सहभागी होणार असून त्यांची विभागणी 12 ग्रुपमध्ये केली जाणार आहे.
कसा असेल नवा फॉरमॅट?
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी फिफाने सुरुवातीला 3-3 टीमचे ग्रुप तयार करण्याचं ठरवलं होतं, त्यापैकी प्रत्येक गटातून दोन टीम नॉक आऊट स्टेजमध्ये पोहोचायच्या. रवांडाची राजधानी किगाली येथे मंगळवारी पार पडलेल्या बैठकीनंतर 4-4 टीम ग्रुपमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत टॉप -2 टीमसह, बेस्ट-8 थर्ड प्लेस टीम अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तिथूनच नॉक आऊट स्टेजला सुरुवात होईल.
नव्या फॉरमॅटनुसार, आता फिफा वर्ल्डकपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. सेमीफायनल आणि फायनल्समध्ये पोहोचणाऱ्या टीम्सना 8-8 सामने खेळावे लागतील. FIFA वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 64 मॅच खेळल्या गेल्या आहेत. 1998 पासून या स्पर्धेत 32 टीम सहभागी होत होत्या. 1998 पूर्वी फिफा विश्वचषकात केवळ 24 टीम सहभागी व्हायच्या. दरम्यान, आता बदललेल्या फॉरमॅटमुळे पुढच्या फिफापासून 48 संघ स्पर्धेत सहभागी होतील.
2026 मध्ये 'या' शहरांकडे FIFA चं यजमानपद
2026 मध्ये अमेरिकेतील जास्तीत जास्त 11 शहरांना FIFA वर्ल्डकपचे सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. यानंतर मेक्सिकोची तीन शहरं आणि कॅनडाची दोन शहरंही विश्वचषकाचे सामने आयोजित करणार आहेत. अमेरिकेत अटलांटा, बोस्टन, डॅलस, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएटल येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. विश्वचषकाचे सामने मेक्सिकोतील ग्वाडालजारा, मेक्सिको सिटी आणि मोंटेरी आणि कॅनडातील टोरंटो आणि व्हँकुव्हर येथे होणार आहेत.