फुटबॉलपटू मेस्सी लायनल पुन्हा गोत्यात
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 01:18 PM (IST)
स्पेन : अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लायनल मेस्सी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. मेस्सीवर स्पेनमध्ये कर चुकवल्यामुळे खटला दाखल करण्यात आला आहे. मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज मेस्सी या दोघांनी स्पेनमध्ये साल 2007 आणि 2009 मध्ये 45 लाख डॉलर एवढा कर बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जाहिरातींपासून मिळणारं उत्पन्न लपवलं स्पेनच्या आयकर विभागाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज या दोघांविरोधात भक्कमपणे खटला चालवून तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. दोघांनीही जाहिरातींपासून मिळणारं उत्पन्न लपवलं. त्यासाठी त्यांनी बेलीज आणि उरुग्वे सारख्या कर नसणाऱ्या देशांमध्ये संपत्ती लपवली, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मेस्सीकडून आरोपांचं खंडन दरम्यान मेस्सी आणि वडील जॉर्ज या दोघांनीही या आरोपांचं खंडन केलं आहे. या खटल्याची सुनावणी तीन दिवस चालणार असून शेवटच्या दिवशी मेस्सी न्यायालयात हजर राहणार आहे. मात्र, सध्या मेस्सी आणि जॉर्ज या दोघांनाही या प्रकरणाबाबत कसलीही माहिती नाही, असं मेस्सीच्या वकिलांनी सांगितलं.