मुंबई : 'एआयबी' शोचा कलाकार तन्मय भटच्या अश्लाघ्य व्हिडीओविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहे. या वादावर भारतरत्न लता मंगेशकर यांनी मौन सोडलं आहे. लता मंगेशकर म्हणाल्या की, "मी हा व्हिडीओ पाहिलेला नाही. मला याबाबत भाष्य करायचं नाही. तन्मय भट कोण आहे, हे मला माहित नाही."
लता मंगेशकर यांनी Spotboye.com या वेबसाईटवर व्हिडीओबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण? 'एआयबी' शोच्या माध्यमातून तन्मय भट्टने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे चेहरे मॉर्फ करुन एक व्हिडीओ ट्विवटरवर शेअर केला होता. ज्यात सचिन आणि लता दीदी यांच्यातील खोटं संभाषण दाखवलं गेलं. मात्र यातील संवाद आक्षेपार्ह आणि अवमान करणारे आहेत.
व्हिडीओ ब्लॉक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरविरोधात अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या एआयबी रोस्ट या शोचा कलाकार तन्मय भटची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. एआयबीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची विशेष शाखा या प्रकरणाचा तपास करत असल्याचं मुंबई पोलिसांमार्फत सांगण्यात आलं आहे.
याशिवाय हा वादग्रस्त व्हिडीओ ब्लॉक करण्यासाठी सायबर सेल गूगल, फेसबुक आणि यू-ट्यूबच्या संपर्कात आहे.
व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांची नाराजी तन्मय भटच्या या व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तन्मय भट विरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांना केली आहे. तसंच मनसेनेही तन्मय भट्ट आणि एआयबी या कार्यक्रमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.