Lionel Messi retirement : फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट लिओनल मेस्सी (Lionel Messi) सध्या सुरु विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेईल अशा बातम्या समोर येत होत्या. पण आता वर्ल्डकप फायनलच मेस्सीचा अर्जेंटिना संघाकडून अखेरचा सामना असेल अशी माहिती समोर येत आहे. अर्जेंटिनाच्या स्थानिक मीडिया आउटलेट डायरिओ डेपोर्टिव्हो ओले (Diario Deportivo Ole) यांना सेमीफायनलच्या क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यानंतर मेस्सीने ही प्रतिक्रिया दिल्याची माहिती एनडीटीव्हीने (NDTV) समोर आणली आहे.


काय म्हणाला मेस्सी?


अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात सेमीफायनलचा सामना नुकताच पार पडला. ज्यामध्ये मेस्सीने कमाल कामगिरी केली. एक गोल आणि एक असिस्ट करत त्याने संघाला 3-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर मेस्सीने डायरिओ डेपोर्टिव्हो ओले या मीडिया आऊटलेटशी बोलताना सांगितले की, “वर्ल्ड कप फायनलचा सामना माझा शेवटचा सामना असून मी तो खेळून माझा विश्वचषक प्रवास पूर्ण करणार आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. पुढच्या विश्वचषकासाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही तोवर मी खेळेल. त्यामुळे इथेच माझा प्रवास थांबवण सर्वोत्तम आहे."


फायनलमध्ये मेस्सी


मेस्सीनं जगभरात अनेकांना फुटबॉलचं वेड लावलं. अर्जेटिंना संघाकडून तसंच बार्सिलोना, पीएसजी अशा क्लब्सकडून दमदार खेळानं मेस्सीनं मोठं नाव कमवलं. सध्या अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणून कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करत आहे.  कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक 2022 मध्ये ही मेस्सी कमाल कामगिरी करत आहे. त्याने अर्जेंटिना संघाकडून सर्वाधिक 5 गोल करत संघाला फायनलपर्यंत पोहोचवलं आहे. पण आता हाच फायनलचा सामना त्याचा कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान त्याचा हा अखेरचा सामना असो किंवा नसो पण यानंतरच्या पुढील विश्वचषकापर्यंत तो नक्कीच निवृत्ती घेणार हे जवळपास निश्चित असल्याने यंदा मेस्सीचा अर्जेंटिना संघच जिंकावा अशी प्रार्थना जगभरातील फुटबॉलप्रेमी करत आहेत.


7 बलॉन डी'ऑर जिंकणारा मेस्सीचं विश्वचषक आजही स्वप्न


आता फ्रान्स लीगमधील प्रसिद्ध क्लब पॅरिस सेंट जर्मनमध्ये खेळणारा मेस्सी आजही तितकाच दमदार खेळ करत आहे. फुटबॉल जगतातील मानाचा बलॉन डी'ऑर हा खिताब मेस्सीने सर्वाधिक 7 वेळा मिळवला आहे. पण असं असलं तरी आजही अर्जेंटिना देशाला विश्वचषक जिंकवूण देण्याची त्याची इच्छा अपूर्ण आहे.  


हे देखील वाचा-