मँचेस्टर:  लोकेश राहुलच्या खणखणीत नाबाद शतकाच्या जोरावर, भारताने मॅन्चेस्टरच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विकेट्स निर्णायक ठरल्या.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं अवघ्या 54 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं.

त्यानं रोहित शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. मग राहुल आणि विराट कोहलीनं 40 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराट कोहलीनं नाबाद 20 धावांची खेळी केली.

सलामीवीर शिखर धवन अवघ्या 4 धावांवर माघारी परतला.

कुलदीपच्या फिरकीसमोर सायबांची गिरकी

मॅन्चेस्टरमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात लोकेश राहुलच्या नाबाद शतकानं भारताच्या विजयाचा कळस बांधला, पण त्याआधी या विजयाचा पाया घातला तो कुलदीप यादवनं. या सामन्यात इंग्लंडला एक बाद 95 धावांवरुन 8 बाद 159 धावांत रोखण्यात कुलदीप यादवनं मोलाची भूमिका बजावली. त्यानं चार षटकांत 24 धावा मोजून इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं.

इंग्लंडच्या जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो आणि ज्यो रूट या पाच प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स कुलदीप यादवनंच काढल्या.

इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 69 धावा केल्या. त्याने 46 चेंडू खेळताना 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले.