फिफा : नेमार तंदुरुस्त, फोटो सोशल मीडियावर शेअर
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2018 11:43 PM (IST)
सेंट पीटर्सबर्गमधल्या विश्वचषक सामन्यात ब्राझिलची गाठ आता कोस्टा रिकाशी आहे. या सामन्यासाठीच्या सरावातून नेमारनं मंगळवारी अंग काढून घेतलं होतं.
रशिया : विश्वचषकातल्या आगामी सामन्यासाठी नेमार तंदुरुस्त असल्याचा संदेश सर्वदूर पोहोचावा याची नेमकी काळजी ब्राझिल घेत आहे. सेंट पीटर्सबर्गमधल्या विश्वचषक सामन्यात ब्राझिलची गाठ आता कोस्टा रिकाशी आहे. या सामन्यासाठीच्या सरावातून नेमारनं मंगळवारी अंग काढून घेतलं होतं. त्यामुळं त्याच्या तंदुरुस्तीविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. पण ब्राझिल फुटबॉल फेडरेशननं नेमारनं बुधवारी केलेल्या सरावाची छायाचित्रं आणि चित्रफित सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ब्राझिलचा पुढच्या सामन्यासाठी सराव सुरू असून, नेमारही त्यात सहजतेनं सहभागी झाला असल्याचं फेडरेशननं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. बघा, बघा नेमार कसा कसून सराव करतोय, असं फेडरेशननं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.