पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या डॉक्टर दाम्पत्याला 10 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होमचे डॉ. आनंद दोशी आणि डॉ. जयश्री दोशी या दाम्पत्याला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक करुन वेळापूर येथे आणले आहे.


गर्भपात केंद्राची मान्यता नसताही गर्भपात केल्याप्रकरणी आनंद हॉस्पिटलवर वैद्यकीय अधीक्षकाकांच्या पथकाने 11 जून रोजी रात्री छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईत गर्भपात झाल्याचे समोर आल्यावर त्यांच्या दोशी अल्ट्रासाऊंड क्लिनिक तसेच आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलला सिल करण्यात आले होते.

या डॉक्टर पती-पत्नींना वेळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असता, ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले होते. या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पोलीस अधीक्षकांनी वेळापूर पोलीस पथकाची चौकशी सुरु केली होती.

दरम्यान, यानंतर पोलिसांनी या डॉक्टर दाम्पत्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवल्यावर आज कर्नाटकातील निपाणी येथील आश्रमात हे दाम्पत्य पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेले हे डॉक्टर दाम्पत्य मुंबई, सातारा, कराड, सांगली येथून आंध्र प्रदेशात लपून बसले होते, नंतर ते पुन्हा कर्नाटकातील निपाणी येथील आश्रमात दाखल झाले होते.