एकान्तेरीबर्ग : जोस गिमेनेझने सामन्याच्या अखेरच्या क्षणी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने इजिप्तवर 1-0 ने मात केली. या विजयासह यंदाच्या फिफा विश्वचषकात उरुग्वेने विजयी सलामी दिली.
एकान्तेरीबर्गच्या एकातेरिना स्टेडियममध्ये हा सामना रंगला. 'अ' गटातील अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना 88व्या मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. संपूर्ण सामन्यात उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेज आणि एडिन्सन कवानीने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.
मात्र 89 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर गिमेनेझने हेडरद्वारे निर्णायक गोल डागत उरुग्वेला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे उरुग्वेने 2018 विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली.
इजिप्तचा प्रमुख शिलेदार 28 वर्षीय मोहम्मह सलाह दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. संपूर्ण सामन्याभर मोहम्मद बेंचवर बसून होता. मात्र तरीही इजिप्शियन खेळाडूंनी चांगला प्रतिकार करत उरुग्वेविरुद्ध झुंजार खेळ केला.