मॉस्को: रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. गटवार साखळीतून बाद फेरीत धडक मारणारे सोळा संघ कोणते? आणि उपउपांत्यपूर्व फेरीत कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघाशी होणार? त्यावर नजर.


रशियातल्या फिफा विश्वचषकाचा गटवार साखळी सामन्यांचं सूप वाजलंय.  या विश्वचषकात आता सुरुवात होणार आहे ती बाद फेरीच्या सामन्यांना. बाद फेरीचा सामना म्हणजे हरला तो संपला या न्यायानं खेळला जाणारा. त्यामुळं विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात खेळाची चुरस आणखी वाढणार आहे.

रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या आठ गटांमध्ये मिळून 32 संघांचा समावेश होता. त्यापैकी प्रत्येक गटातून दोन सर्वोत्तम संघ आता बाद फेरीसाठी म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

कोणते आहेत हे सोळा संघ? आणि उपउपांत्यपूर्व फेरीत कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघाशी होणार आहे?

विश्वचषकाच्या अ गटातून उरुग्वे आणि रशिया,

ब गटातून स्पेन आणि पोर्तुगाल,

क गटातून फ्रान्स आणि डेन्मार्क,

ड गटातून क्रोएशिया आणि अर्जेंटिना,

ई गटातून ब्राझिल आणि स्वित्झर्लंड,

फ गटातून स्वीडन आणि मेक्सिको,

ग गटातून बेल्जियम आणि इंग्लंड,

ह गटातून कोलंबिया आणि जपान

या संघांनी बाद फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना 30 जूनला रात्री साडेसात वाजता खेळवण्यात येईल. फ्रान्स आणि अर्जेंटिना संघांमधला हा सामना कझान एरिनात होणार आहे.

उपउपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना 30 जूनलाच रात्री साडेअकरा वाजता सुरू होईल. सोचीतल्या फिश्त स्टेडियमवरच्या या सामन्यात लुई सुआरेझचा उरुग्वे आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आमनेसामने उभे ठाकतील.

उपउपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना एक जुलैला रात्री साडेसात वाजता मॉस्कोच्या ल्युझिनिकी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यात स्पेनसमोर आव्हान आहे ते यजमान रशियाचं.

उपउपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना एक जुलैला रात्री साडेअकरा वाजता निझनी नोवगोरोड स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील क्रोएशिया आणि डेन्मार्कचे संघ.

उपउपांत्यपूर्व फेरीचा पाचवा सामना दोन जुलैला रात्री साडेसात वाजता समारा एरिनात खेळवण्यात येईल. प्रतिस्पर्धी संघ असतील ब्राझिल आणि मेक्सिको.

उपउपांत्यपूर्व फेरीचा सहावा सामना दोन जुलैला रात्री साडेअकरा वाजता रोस्तोव्ह एरिनात खेळवण्यात येईल. या सामन्यात बेल्जियमची गाठ जपानशी पडेल

उपउपांत्यपूर्व फेरीचा सातवा सामना तीन जुलैला रात्री साडेसात वाजता सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यात स्वीडनसमोर आव्हान आहे ते स्वित्झर्लंडचं.

उपउपांत्यपूर्व फेरीचा आठवा सामना तीन जुलैला रात्री साडेअकरा वाजता मॉस्कोच्या स्पार्टाक स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यातले दोन प्रतिस्पर्धी संघ असतील कोलंबिया आणि इंग्लंड.

विश्वचषकाच्या या उपउपांत्यपूर्व फेरीचं वैशिष्ट्य म्हणजे वरच्या हाफमध्ये तुलनेत अधिकाधिक तगड्या संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळं तळाच्या हाफपेक्षा वरच्या हाफमधून फायनल गाठणं तुलनेत कठीण ठरणारय.