“नाणारचा प्रकल्प हे जहर आहे आणि तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. कोकणची जनता सुखी आहे, त्यांच्या सुखात विष कालवू नका. जर असा प्रयत्न भाजपकडून झाला तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू” अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.
यापूर्वी नाणारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची भेट घेतली. पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
नाणारवर मध्यस्थीसाठी पुढील काही दिवसात हालचाली होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मध्यस्थी करणार आहे. या पार्श्र्वभूमीवर शिवसेनेने सामनातून भाजपवर टिकास्त्र सोडला आहे.
एक नजर सामनच्या अग्रलेखावर
- कोकणातील शेती, फळबागा हा रोजगार आहे, त्या सगळ्यांचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती भाजप सरकार करणार आहे? असा थेट सवाल शिवसेनेने केला आहे.
- कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. पण जर असा प्रयत्न भाजपकडून झाला तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावण्याची धमकी देण्यात आली आहे.
- नाणारचा प्रकल्प हे जहर आहे आणि तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे.
- प्रकल्प लादून बघाच, हे आमचे आव्हान आहे अशा कठोर शब्दात टीका करत भाजपला थेट आव्हानच देण्यात आले आहे.
- फक्त केंद्रातलेच नव्हे तर राज्याराज्यांतील ‘पर्यावरण’ खाती आता कायमचीच बंद करायला हवी असे ‘सामना’त म्हटलं आहे.