FIFA world cup 2018 मॉस्को (रशिया): लायनल मेसीची अर्जेंटिना फ्रान्सकडून झालेल्या पराभवामुळं विश्वचषकातून आऊट झाली आहे.  रोनाल्डोचा पोर्तुगालला उरुग्वेकडून झालेल्या पराभवामुळं विश्वचषकातून गाशा गुंडाळावा लागला,तर सर्जियो रामोसच्या स्पेनला रशियानं शूटआऊट जिंकून गेटआऊट केलं.

अर्जेंटिना, पोर्तुगाल आणि स्पेन... या तीन तगड्या संघांचं फिफा विश्वचषकातलं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळं विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे.

कसं आहे रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं चित्र?

उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना हा सहा जुलैला निझनीत रात्री साडेसात वाजता खेळवण्यात येईल. या सामन्यात दियागो गॉडिनच्या उरुग्वेसमोर आव्हान आहे ते अॅन्टॉईन ग्रिझमनच्या फ्रान्सचं.

उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना हा सहा जुलैला कझान एरिनात रात्री साडेअकरा वाजता खेळवण्यात येईल. या सामन्यात थियागो सिल्व्हाच्या ब्राझिलसमोर आव्हान आहे ते थिबो कोर्टुआच्या बेल्जियमचं.

उपांत्यपूर्व फेरीचा तिसरा सामना हा सात जुलैला समारा एरिनात रात्री साडेसात वाजता खेळवण्यात येईल. या सामन्यात आंद्रेस ग्रॅन्क्विस्टच्या स्वीडनसमोर आव्हान आहे ते हॅरी केनच्या इंग्लंडचं.

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना हा सात जुलैला सोचीच्या फिश्त स्टेडियमवर रात्री साडेअकरा वाजता खेळवण्यात येईल. या सामन्यात इगोर अकिनफिव्हच्या रशियासमोर आव्हान आहे ते ल्युका मॉडरिचच्या क्रोएशियाचं.

रशियातल्या फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या आठपैकी उरुग्वे, फ्रान्स, ब्राझिल आणि इंग्लंड या चार संघांनी याआधी विश्वचषक जिंकला आहे. पण बेल्जियम, स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया या चार संघांनी आजवरच्या इतिहासात कधीही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळं यंदा विश्वचषकाला नवा विजेता मिळणार का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.