मुबंई : पीएनबी घोटाळा प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी आरोपी मेहुल चोक्सी व अन्य पाच जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. यापूर्वी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने एप्रिलमध्ये चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले हाते. ते रद्द करण्यासाठी चोक्सीने काही दिवसांपूर्वीच सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.


भारतात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात पलायन केलेल्या चोक्सीविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए कायद्याखाली गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांसंदर्भात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती ईडी ने 2 जुलै रोजी केली होती. यात पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतील व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, गीतांजली ग्रुपच्या बँकिंग ऑपरेशन्सचा उपाध्यक्ष विपुल चितलिया, जैन डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचा मालक धर्मेश बोथ्रा, गीतांजली जेम्स लिमिटेडचा संचालक सुनील वर्मा, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड कंपनीतील जयेश शाह या नावांचा समावेश होता.

पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश सलमान आझमी यांनी ईडीच्या अर्जाची गंभीर दखल घेत या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या अर्जावरील पुढील सुनावणी 31 जुलैला होणार आहे.