मॅन्चेस्टर : भारतानं पहिला टी-20 सामना जिंकत इंग्लंड दौऱ्याचा विजयी श्रीगणेशा केला आहे. कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि लोकेश राहुलचं तुफानी शतक सामन्यात निर्णायक ठरलं. मात्र चर्चा भारताचा कर्णधार विराट कोहलीची जास्त सुरु आहे. विराटनं या सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली. विराटनं या सामन्यात नाबाद 20 धावांची खेळी केली.


विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटनं 8 धावा केल्या आणि हा विक्रम आपल्या नावे केला. आतंरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावांचा पल्ला गाठणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे.


विराटने अवघ्या 56 सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्क्युलमच्या नावे होता. टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल 2271 धावांसह आघाडीवर आहे. ब्रॅंडन मॅक्क्युलम 2140 धावांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा शोएब मलिक 2039 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


भारताची विजयी सुरुवात


कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं अवघ्या 54 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं.


राहुलनं रोहित शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर राहुल आणि विराट कोहलीनं 40 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.