रोनाल्डोचा विक्रमी गोल, पोर्तुगालचा पहिला विजय


रशिया : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं चौथ्याच मिनिटाला हेडरवर केलेल्या गोलनं पोर्तुगालला रशियातल्या फिफा विश्वचषकात पहिला विजय मिळवून दिला. पोर्तुगालनं या सामन्यात मोरोक्कोवर १-० असा विजय मिळवला.

पोर्तुगालनं सलामीच्या सामन्यात स्पेनला ३-३ असं बरोबरीत रोखलं होतं. त्यामुळं बाद फेरीच्या शर्यतीत मुसुंडी मारण्यासाठी पोर्तुगालला मोरोक्कोवर विजय मिळवणं आवश्यक होतं.

पोर्तुगालनं मोरोक्कोला हरवून, ब गटात अव्वल स्थानावर झेप घेतली. आंद्रे सिल्व्हाच्या कॉर्नरवर रोनाल्डोनं पुढे झुकून हेड केलेला चेंडू नेमका गोलपोस्टमध्ये गेला. रोनाल्डोचा हाच गोल पोर्तुगालच्या विजयात निर्णायक ठरला.

रोनाल्डोची भूमिका निर्णायक

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं पोर्तुगालच्या मोरोक्कोवरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावून, रशियातल्या फिफा विश्वचषकात आपली गोलसंख्या चार नेली. स्पेनविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं गोलची हॅटट्रिक साजरी केली होती. या चार गोलसह रोनाल्डोच्या नावावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आता ८५ गोल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानात सर्वाधिक गोल डागणारा तो युरोपीय फुटबॉलवीर ठरला आहे. याआधी हा विक्रम हंगेरीच्या फेरेन्क पुशकसच्या नावावर होता. त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ८४ गोल केले होते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक १०९ गोल्सचा विक्रम इराण अली डोईच्या नावावर आहे.