बंगळुरु : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्यांदा झालेली यो यो टेस्ट पास झाला. याअगोदर दिलेल्या यो यो टेस्टमध्ये पास होण्यात रोहितला अपयश आलं होतं. त्यामुळे त्याचं संघातील स्थानही धोक्यात होतं.
“यो यो टेस्ट पूर्ण, आता लवकरच आयर्लंड दौऱ्यावर”,असं इंस्टाग्रामवर लिहित रोहितने याबाबत माहिती दिली.
याअगोदर आयपीएलदरम्यान झालेल्या दोन्ही यो यो टेस्टमध्ये रोहित शर्मा नापास झाला होता. त्यामुळे रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. मात्र आता टेस्ट पास झाल्याने भारतीय संघासाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी बीसीसीआयकडून यो यो टेस्ट घेण्यात येते. संघातील अन्य मोठे खेळाडू या टेस्टमध्ये पास झाले होते. मात्र रोहित पहिल्यांदा या टेस्टमध्ये पास झाला नव्हता. दुसऱ्यांदा झालेल्या टेस्टमध्ये तो पास झाला.
रोहित या टेस्टमध्ये पास झाल्याने इग्लंड दौऱ्यासाठी अजिंक्य राहणेच्या संघात पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण, दुसऱ्या यो यो टेस्टमध्ये रोहित नापास झाल्यास रहाणेचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता होती.
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर सर्व खेळाडूंची यो यो टेस्ट बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत घेण्यात आली. या टेस्टमध्ये प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणं बंधनकारक होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या फिटनेसचं महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरु केलेली यो यो फिटनेस टेस्ट महत्त्वाची आहे. फिटनेससोबत तडजोड केली जाणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी स्पष्ट केलं होतं.