FIFA World Cup 2018: हॅरी केनचे सुपरगोल, इंग्लंडची ट्युनिशियावर मात
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 07:46 AM (IST)
या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो हॅरी केन. त्यानंच इंग्लंडच्या दोन्ही गोल्सची नोंद केली.
मॉस्को: इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 अशी मात करून, फिफा विश्वचषकात शानदार विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो हॅरी केन. त्यानंच इंग्लंडच्या दोन्ही गोल्सची नोंद केली. अकराव्या मिनिटाला अॅशली यंगच्या कॉर्नर किकवर जॉन स्टोन्सचा हेडर ट्युनिशियाचा गोलरक्षक हासेनन थोपवला. पण चेंडू हॅरी केनच्या दिशेनं उडाला. त्यानं तो चेंडू नेमका गोलपोस्टमध्ये धाडला. मग 35 व्या मिनिटाला फरजानी सासीनं पेनल्टी किकवर ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर हॅरी केननं एन्जुरी टाईममध्ये इंग्लंडचा दुसरा गोल झळकावला. कायरन ट्रिपिअरच्या कॉर्नर किकवर हॅरी मॅग्वायरनं हेड केलेला चेंडू हॅरी केनच्या दिशेनं उडाला. त्यानं तो हेडरवरच गोलपोस्टमध्ये धाडला. या विजयामुळे जी गटात इंग्लंड आणि बेल्जियम पहिल्या स्थानावर आहेत. बेल्जियमने पनामाचा 3-0 असा पराभव केला. बेल्जियमचा विजय बलाढ्य बेल्जियमनं पनामाचा 3-0 असा धुव्वा उडवून आपल्या विश्वचषक मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. ग गटातल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. पण उत्तरार्धात ड्रिएस मर्टन्सनं 47व्या मिनिटाला केलेल्या गोलनं बेल्जियमचं खातं उघडलं. रोमेलू लुकाकूनं 69व्या मिनिटाला हेडरवर बेल्जियमचा दुसरा गोल झळकावला. त्यानंतर 75व्या मिनिटालाच ईडन हेझार्डच्या पासवर लुकाकूनं आणखी एक गोल डागत बेल्जियमला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.