मॉस्को : फ्रान्सने अखेर 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं. मॉस्कोतल्या ल्युझनिकी स्टेडियमवरच्या सामन्यात फ्रान्सने झुंजार क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला.


फिफाच्या इतिहासात विश्वचषक जिंकण्याची फ्रान्सची ही दुसरी वेळ ठरली. फ्रान्सने याआधी 1998 साली ब्राझिलचा 3-0 असा धुव्वा उडवून विश्वचषक जिंकला होता. फ्रान्सचे विद्यमान प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांच्याच नेतृत्त्वाखाली फ्रान्सने 1998 सालचा विश्वचषक जिंकला होता.

सामना सुरु झाल्यानंतर फ्रान्सच्या मानजुकिचने अठराव्या मिनिटालाच पहिला गोल डागला. त्यानंतर पेरिसिसने गोल डागत 28 व्या मिनिटाला बरोबरी साधली. सामन्यात रंगत चढली असतानाच फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली, ज्याचा फायदा घेत फ्रान्सच्या ग्रीजमॅनने दुसरा गोल केला.

फ्रान्सने आपली आघाडी कायम राखत अखेर क्रोएशियावर 4-2 ने मात केली आणि 20 वर्षांनी विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण केलं.

विश्वचषकातील फ्रान्सचा प्रवास

विश्वचषकाच्या क गटात फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला 2-1 असं हरवून विजयी सलामी दिली. मग फ्रान्सने पेरूवर 1-0 अशी मात केली. त्यानंतर फ्रान्स आणि डेन्मार्कचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.

फ्रान्सने खरी कमाल केली ती बाद फेरीत. फ्रान्सने उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचं आव्हान 4-3 असं मोडून काढलं. मग फ्रान्सने उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेचा 2-0 असा फडशा पाडला. त्यानंतर फ्रान्सने बेल्जियमला 1-0 असं नमवून फायनलचं तिकीट बुक केलं.